विष्णुस्वरुप शाळिग्राम
Published by Mitaraj under अन्नपूर्णा परिक्रमा, काली गंडकी, गंडकी शिळा, मुक्तिनाथ, शाळिग्राम on January 27, 2024#श्रीराम_सीता_मूर्ती
हे #विष्णुस्वरुप शाळिग्राम जिथं प्राप्त होतात,ती एकमात्र नदी #काली_गण्डकी आहे...
हिचं एक नाव #शालिग्रामी असंही आहे, आणि #नारायणीही...
ही नदी मुक्तिधाम येथील #दामोदर_कुण्डातून उगम पावून गंगेला येऊन मिळते...
कालीगंडक नदीच्या तीरावर सापडलेल्या या शिळांपैकी एक २६ टनी व एक १४ टनी आहे.
या शाळिग्राम शिळा नदीतून काढण्यापूर्वी
काली गंड़की नदीमध्ये क्षमा पूजा केली गेली आणि विशेष पूजा उपरांत या
या शिळांना २६ जानेवारी रोजी नेपाळमधील गलेश्वर महादेव मंदिरात रूद्राभिषेक केला गेला..
सोमवार ३० जानेवारी २०२३ रोजी अयोध्येकडे प्रस्थान करण्यात आलं..
काली गंडकी नदीत ६ कोटी वर्षांपूर्वीचे शाळिग्राम आहेत हेच अचंबा करण्यासारखं आहे.
पण हे सत्य आहे...
सत्, त्रेता,द्वापर व कलि या चार युगांना चतुर्युग म्हणतात, या चतुर्युगांचं मिळून एक महायुग तयार होतं...
चार युगांची ४३,२०००० मानवी वर्षे..(३६०×१२,०००)
अशी ७१ चतुर्युगं किंवा महायुगं म्हणजे एक #मन्वंतर..म्हणजे कितीतरी कोटी वर्ष.
एका कल्पात १४ मन्वंतरं असतात. आणि अशी ९९४ चतुर्युगे मिळून एक कल्प बनतो...
एक #कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस-रात्र होतो...
ब्रम्हदेवाच्या दिवसात सृष्टी उत्पन्न होते आणि रात्रीत ती लय पावते...
मन्वंतरांपैकी एकूण ६ मन्वंतरं होऊन गेली आहेत..
आत्ता चालू आहे ते #वैवस्वत_मन्वंतर..
आपण संकल्प वगैरे सोडतो त्यामध्ये वैवस्वताचा उल्लेख येतोच..
स्वायंभुव , स्वारोचिष, उत्तम , तामस, रैवत, चाक्षुष ही मन्वंतरं होऊन गेली आहेत..अन वैवस्वत मन्वंतर चालू आहे..
तर #स्वायंभुव_मन्वंतरातली ही कथा..( भाकड नाही)..म्हणजे पहिल्या मन्वंतरातली..
दर चतुर्युग समाप्त झाल्यावर पृथ्वीवर प्रलय होतो अन ती लुप्त होते...( ब्रह्मदेवांची रात्र)
अन पुन्हा ती उत्पन्न होते ( ब्रह्मदेवांचा दिवस)
मस्तांग खोरं, काली गंडकी नदी पात्र, २००८, अन्नपूर्णा परिक्रमा करताना
#जलंधर_वृंदा...
#जलंधर हा शिवांश, शिवांच्या क्रोधाग्नीतून उत्पन्न झाला, ( तो कसा उत्पन्न झाला हे सविस्तर नंतर)
#कालनेमि_पुत्री #वृंदाशी विवाह झाला त्याचा..
कालांतरानं त्यानं त्रिलोकांवर आधिपत्य मिळवलं..आणि साहजिकच अत्याचार करु लागला...
वृंदेच्या पातिव्रत्याचं कवच असल्याने त्याचा सहज वध शक्य नव्हता..
भगवान विष्णूंनी जलंधरचं रुप धारण केलं, अन युद्धभूमीतून जलंधर विजयी होऊन परत आलाय अअसं समजून वृंदानं त्याला ओवाळलं, अन इथं तिचं एक क्षणभरासाठी चित्त विचलित झाल्यानं जलंधरचं सुरक्षा कवच भंग झालं.
तत्क्षणी शिवांनी त्याचा त्रिशूलानं वध केला.
वंदेनं देहत्याग केला अन तत्पूर्वी वृंदानं विष्णूंना शाप दिलेत,
एक म्हणजे तुम्ही शाळिग्राम होऊन नदीत पडाल, जिथं कीटकही कुरतडत राहतील आणि तुम्हालाही एक जन्मी पत्नी वियोग सहन करावा लागेल, दुसरा शाप म्हणजे श्रीराम जन्म..या जन्मात / अवतारात पत्नी वियोग सहन करावा लागला..
पहिल्या शापानुसार काली गंडकीमध्ये शाळिग्राम, ज्यांची वेगवेगळी विष्णू स्वरुपं आहेत, भगवान विष्णूंनी शाळिग्राम स्वरूप धारण करुन मुक्ती मिळवली.
आणि अन्य शाळिग्रामांना भगवान विष्णूंच्या आज्ञेनं विश्वकर्मांनी #बज्रकीट रुप धारण करुन कोट्यवधी वर्षांपर्यंत विभिन्न रुपात निर्माण केलं.
( बज्रकीट- कीटक, वृंदेच्या शापानुसार कीटक कुरतडत राहतील)
ही कथा करोडो वर्षांपूर्वीची,असंख्य कल्पांपूर्वीची..पहिल्या मन्वंतरातली.
वृंदेला तुलसीचा जन्म मिळाला, तिला हे वरदान दिलंय तिला विष्णूंनी,
तुलसी होऊन तू माझी ( शाळिग्रामा) अर्धांगी म्हणून पुजली जाशील..
तुलसी विवाह करतो आपण..
इथं एक कथा शंखचूड व वृंदेचीही आहे.
वेगवेगळ्या आकाराचे,अन विष्णूंची नावं असणारे शाळिग्राम..
गोल शाळिग्राम हे विष्णूंचं गोपाल रुप..
मत्स्याकार शाळिग्राम हे मत्स्यावताराचं प्रतिक.
कासवाच्या आकाराचे कच्छपावताराचं प्रतिक.
याशिवाय शाळिग्रामांवर उमटणाऱ्या रेषा व चक्रं हे विष्णूंच्या अन्य अवतारांना सूचित करतात..
दामोदर, श्रीधर,रणराम, राजराजेश्वर, अनंत, सुदर्शन, मधुसूदन, हयग्रीव, नरसिंह, वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण, अनिरुद्ध अशी काही नावं या शाळिग्रामांची...
जवळजवळ ३३ प्रकारचे शाळिग्राम ,ज्यापैकी २४ भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचे द्योतक आहेत.
( १० मुख्य व १४ अंशावतार आहेत)
हे सर्व २४ शाळिग्राम वर्षातील २४ एकादशी व्रतांशी संबंधित आहेत.
जिथून काली गंडकी नदी उगम पावते,ते #दामोदर_कुंड,विष्णूंचं स्थान, आणि काली गंडकी नदीजवळच आहे #मुक्तिनाथ,विष्णू मंदिर.
महाभारताच्या सभापर्वात या नदीचा उल्लेख मिळतो
- 'तत: स गंडकाञ्नछूरोविदेहान् भरतर्षभ:,
विजित्याल्पेन कालेनदशार्णानजयत प्रभु:।'
#सदानीरा असा उल्लेख प्राचीन साहित्यात अनेक वेळा आला आहे..
ती संभवत: गंडकी नदी आहे...
- 'गंडकींच महाशोणां सदानीरां तथैव थ।'- २९; ४-५।
या नदीचं तीर्थरूपातही वर्णन केलंय,-
'गंडकीं तु सभासाद्य सर्वतीर्थ जलोद्भवाम् । वाजपेयमवाप्नोति सूर्यलोकं च गच्छति'।।
इतकी ही प्राचीन नदी..
असं सांगितलंय की, कलियुगात काही हजार वर्षांनंतर गंगा इ. नद्या अपवित्र होतील,पण गंडकी नदी ही कलियुगाच्या अंतापर्यत पवित्र राहिल.
शाळिग्राम आणि श्रीराम हा अलौकिक योग आहे..ज्या विष्णूंचा सप्तम अवतार भगवान श्रीराम आहेत, त्यांची मूर्ती ही भगवान विष्णूंनी धारण केलेल्या शाळिग्राम स्वरूपातून अवतरणार आहे...
काली गंडकी नदी ही पृथ्वीवरील अति पवित्र व महत्वाची नदी...
जिला स्वतः शांडिल्य ऋषिंनी संरक्षित केलंय..गंडकी नदी जिथून उगम पावते, ते #दामोदर_कुंड हे अति पवित्र कुंड...
इथं ब्रह्मदेवांनी केलेल्या यज्ञानंतर भगवान रुद्र शिव हे अग्नि स्वरूपात व भगवान विष्णू शीतल जल स्वरूपात उत्पन्न झाले..
इथं आहे #मुक्तिनाथ_मंदिर…
१०८ दिव्य क्षेत्रांपैकी एक मुक्तिनाथ ...
एकवेळ याचं दर्शन घेतल्यास मुक्तिचा मार्ग प्रशस्त होतो..
नेपाळ मध्ये अन्नपूर्णा परिक्रमा मार्गावर जाॅमसोमपासून १८ किमी ३७४९ मी उंचीवर असणारं हे मंदिर..
थोरोंग फेडी हे ५४१६ मी उंचीवर असणारं स्थान तिथून मुक्तिनाथपर्यंत १६ किमी ट्रेक करुन जातात.
( अन्नपूर्णा परिक्रमेतली ही महत्वाची स्थानं..)
याचं वैशिष्ट्य, इथं १०८ गोमुखं आहेत.
आणि दामोदर कुंडात उगम पावून काली गंडकी नदी या १०८ गोमुखातून वाहते व प्रवाहित होते.
आजपासून दोन अब्जापेक्षा जास्त वर्षांपूर्वी पृथ्वीवर पहिल्यांदा सृष्टी उत्पन्न झाली..
पुराणांनुसार पृथ्वी ७ भाग व ४ क्षेत्रात विभागलेली..
सर्वप्रथम मानवी सभ्यतेचा विकास #जंबुद्वीपातून झाला ( जंबुद्वीपे भरतखंडे म्हणतो आपण) ...
जंबूद्वीपाचं पर्यायानं भरतखंडाचं ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक महत्व हे कशाहीपेक्षा उच्चकोटीचं आहे..याचा अभिमान वाटायला हवा..
जंबूद्वीपात ४ क्षेत्रं, चार धाम, सप्तपुरीतील यांचा उल्लेख मिळतो..
( ब्रह्मवैवर्त, वराह,पद्म,ब्रह्मांड, स्कंद पुराण)
या क्षेत्रात प्रमुख मुक्ति क्षेत्र हे हिमवंत खंडात नेपाळ येथे असणारं मुक्तिनाथ.
भगवान बद्रिविशालजींची मूर्तीही गंडकी शिळेची आहे..
माहितीसाठी, केदारनाथ मंदिर पांडव/जन्मेजयानं बांधलं तेव्हा ते काली गंडकीतल्या शिळांपासूनच बांधलं..
मग शंकराचार्यांनी जीर्णोद्धार केलाय.
वैज्ञानिक कारणं तर आहेतच,
जसं की,प्रागैतिहासिक काळात Indo Australian व Eurasian tectonics plates च्या घर्षणानं टेथिस सागराच्या तळाशी भूगर्भीय हालचाली होऊन हिमालयाची उत्पत्ती झाली.
आणि इतर महाद्वीपातून आलेल्या मातीत अनेक जीव दबले गेले.पृथ्वीची उष्णता व दबावामुळं पहाड तयार होत गेले.व या पहाडांमध्ये दबलेल्या समुद्री जीवांचे जीवाश्म तयार झाले,ज्यापासून शाळिग्राम..
या शाळिग्रामांची ही अशी अब्जावधी वर्षांची परंपरा आहे..
हा योगायोग नाहीये, राममूर्तीसाठी शाळिग्रामांची निवड.
हा एक अलौकिक योग आहे...
अन्नपूर्णा परिक्रमा केली २००८ मध्ये..तेव्हा हे किती दुर्मिळ योग आहेत हे समजलं नव्हतं.
मुक्तिनाथ ,गंडकी, मस्तांग खोरं बघणं आज सफल झाल्यासारखं वाटतंय..
थोरोंग फेडी / थोरोंग पास करुन पलीकडे उतरताना..५४१६ मी २००८, अन्नपूर्णा परिक्रमा करताना,
थोरोंग फेडी पास क्राॅस करताना..२००८, अन्नपूर्णा परिक्रमा करताना
© डॉ अमिता कुलकर्णी
तळटीप
६ कोटी वर्ष म्हणल्यावर शंका उत्पन्न होतात, पण, जर भारतीय संस्कृतीमधली कालगणना, युग व कल्प संकल्पना लक्षात घेतली तर ही कितीतरी प्रगत होती हे समजेल..
चतुर्युगं, त्यापासून महायुग, कल्प ,मन्वंतर या भाकड कल्पना नाहीत. किंवा मिथकंही नाहीत.
सृष्टी उत्पत्ती, लय हे यातूनच येतं.
आणि आपल्या पुराणांतून याचे उल्लेख आहेत.
यावर हिंदू धर्मीय म्हणून नितांत विश्वास हवा..
पुराणं,वेद, उपनिषदं ही मिथक नाहीत.
सृष्टीचक्रात आजही असंख्य उलथापालथी होताहेत, ज्या आपल्या सामान्य मानवी बुद्धीपलीकडच्याच आहेत.
प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीवर तपासत बसू नते, काही गोष्टींना उत्तरं नसतात,शोधूही नयेत..
काही तर्काच्या पलीकडचं असतं, ते स्वीकार करता आलं पाहिजे.
उदा जलंधर उत्पत्ती झाल्यानंतर महादेवांनी आदियोगी बनून संपूर्ण जगाला #अष्टांगयोग दिलाय. जलंधर हे निमित्त फक्त
असे अनेक असुर वा गोष्टी उत्पन्न झाल्या पण त्यामागं केवळ पृथ्वीचं संरक्षण हे कारण होतं,आहे व राहिल
राहिल अशासाठी कारण एक चतुर्युग संपलं की दुसरं येतं.
घडामोडी घडत राहतात.
ब्रह्मांड हे अत्यंत अनाकलनीय असं आहे...


































